Breaking
राजकिय

ज्यांना जनतेने अपात्र केले, त्यांनी पात्रता शिकवू नये – वर्षा गंगुले

0 0 1 1 1 9

ज्यांना जनतेने अपात्र केले, त्यांनी पात्रता शिकवू नये – वर्षा गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी :- २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला प्रभागातील नागरिकांनी घरी बसविले आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या नेत्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना घरी पाठवून तुमची पात्रता काय आहे हे दाखवून देवून तुम्हाला जनतेने अपात्र केले आहे. त्यामुळे ज्यांना जनतेने अपात्र केले आहे त्यांनी पात्रता शिकवू नये असा पलटवार राष्ट्रवादीच्या नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले यांनी भाजपच्या माजी नगरसेविका अलका लकारे यांनी केलेल्या टीकेवर केला आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका अलका लकारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देत श्रीमती वर्षा गंगुले यांनी त्यांना जमिनीवर आणतांना स्पष्ट शब्दात सुनावले आहे. त्या म्हणाल्या की, जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या संधीचे सोने करून विकासकामे करायची असतात. मात्र माजी लोकप्रतिनिधींनी मागील पाच वर्षात विकासकामे न केल्यामुळे कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासारख्या विकासाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. आपले अपयश कुणाच्या तरी माथी मारायचे आणि आपल्यालाच विकासाची कशी तळमळ आहे हे दाखवायच्या नादात त्यानी खड्डे बुजविण्याचे काम सुरु असतांना खड्डे बुजविण्यासाठी केलेले आंदोलन फसले. जनता हुशार आहे त्यांना विकास कोण करते याची जाणीव आहे. त्यामुळे आपण कुठेतरी प्रवाहाच्या बाहेर जातो की काय असा प्रश्न पडलेल्या माजी आमदार कोल्हे यांनी खड्डे बुजविण्याचे केलेले आंदोलन त्यांच्याच अंगलट आले आहे. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता असतांना त्यांना खड्ड्यात बसायला मुहूर्त सापडला नाही का? असा तिरकस सवाल श्रीमती वर्ष गंगुले यांनी माजी आमदार कोल्हेंना विचारला आहे.

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून येणाऱ्या अडचणी सोडवून १७८ कोटी निधी मिळविला आहे. मात्र ज्यांना त्यांची एकहाती सत्ता असतांना काही करता आले नाही त्या माजी आमदार खड्ड्यात बसून आंदोलन करतात हे हास्यास्पद आहे. स्वत:च्या पक्षाचे सरकार असतांना माजी आमदारांना पाच वर्षात जे जमले नाही ते आ. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात करून दाखविले. अडीच वर्षात संपूर्ण मतदार संघाचा विकास साधतांना शहराचा ज्वलंत झालेला पाणी प्रश्न त्यांनी मार्गी लावला, कोपरगाव शहराला निधी देवून रस्त्यांची कामे मार्गी लावले, कोपरगाव नगरपरिषदेत विरोधी पक्षाची भूमिका बजावतांना आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकास कामांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कधीही विरोध केला नाही. याउलट आपण काय केले याचे माजी आमदार कोल्हे यांनी आत्मपरीक्षण केले तर निश्चितच त्यांना त्याची जाणीव होईल.

२८ कामांना विरोध करायला लावणारे कोण आहेत हे जनतेच्या मनात पक्के बसलेले आहे. त्यामुळे विकासाला विरोध करणाऱ्याला जनता निवडणुकीत नेहमी अपात्र ठरवत असते. हेच अलकाताई तुमच्या बाबतीत आणि आंदोलनाचे ढोंग करून जनतेला वेड्यात काढणाऱ्या तुमच्या नेत्या माजी आमदार कोल्हे यांच्या बाबत घडले असून जनतेने तुम्हाला प्रायश्चित दिले आहे. ते यापुढील काळात देखील भोगावे लागणार आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील अगोदर तुमची पात्रता ओळखा आणि नंतर दुसऱ्यांना पात्रता शिकवा असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादीच्या नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले यांनी भाजपच्या माजी नगरसेविका अलका लकारे यांना दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 1 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे